पुणे : इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असतानाच पुणे जिल्ह्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. टोरेंट गॅस आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) या दोन कंपन्यांनी वेगवेगळ्या भागांत दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
टोरेंट गॅसने ग्रामीण पुणे परिसरातील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी १००.५० रुपये असलेला दर आता १०१.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. ही वाढ १७ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सीएनजी दरात प्रतिकिलो १.२५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ९७.७५ रुपये असलेला दर आता ९९ रुपये प्रतिकिलो झाला आहे. ही दरवाढ १३ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसराचाही यामध्ये समावेश आहे.
वाहनचालकांच्या खर्चात वाढ
सीएनजी दरवाढीचा परिणाम प्रामुख्याने रिक्षाचालक, टॅक्सीचालक, व्यावसायिक वाहनधारक आणि दररोज लांबचा प्रवास करणाऱ्या नोकरदारांवर होणार आहे. इंधन खर्च वाढत असताना प्रवासी भाडेवाढ करता येत नसल्याने वाहनचालकांच्या उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.