गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ; सीएसआर आणि मोठ्या देणगीदारांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा
मुंबई, दि. २७ :
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहायता निधीला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून निधी उभारणीचे नवे व्यासपीठ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची सोशल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, यकृतविकार, मेंदूविकार तसेच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. गेल्या काही वर्षांत मदतीसाठी अर्ज करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने निधी उभारणीचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सोशल स्टॉक एक्स्चेंज म्हणजे काय?
सामान्य शेअर बाजारात कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री होते. मात्र, सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांसाठी निधी उभारणी करणारे विशेष व्यासपीठ आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) येथे सेबीच्या नियमनाखाली हे व्यासपीठ उपलब्ध आहे.
या माध्यमातून पात्र ना-नफा संस्था झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल (ZCZP) या साधनाद्वारे निधी उभारू शकतात. यामध्ये योगदान देणाऱ्यांना आर्थिक परतावा मिळत नाही, तर सामाजिक कार्यासाठी योगदान देण्याची संधी मिळते.
सीएसआर निधी आणि मोठ्या देणगीदारांचा सहभाग
सोशल स्टॉक एक्स्चेंजमुळे मुख्यमंत्री सहायता निधीला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधी देणाऱ्या कंपन्या, मोठे देणगीदार, फाउंडेशन आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
विशेषतः कर्करोग, हृदयरोग, किडनी व यकृत प्रत्यारोपण, मेंदूविकार तसेच दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी अतिरिक्त निधी उभारण्यास मदत होऊ शकते. याशिवाय निधीच्या माध्यमातून झालेल्या कामाचा सामाजिक परिणाम मोजणे आणि अधिकाधिक देणगीदारांना सहभागी करून घेणे शक्य होणार आहे.
निधी उभारणीसाठी यापूर्वीही प्रयत्न
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून त्रिपक्षीय निधी उभारणी तसेच स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना अतिरिक्त आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीचीही स्थापना करण्यात आली आहे.
महागड्या शस्त्रक्रियांसाठी विशेष प्रयत्न
येत्या काळात दुर्मिळ आजार, महागडे उपचार आणि अत्याधुनिक शस्त्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या खर्चाच्या प्रस्तावांची या नव्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, हा मुख्यमंत्री सहायता निधीचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून निधी उभारणीचे नवे मार्ग उपलब्ध झाल्यास गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.