कोल्हापूरचा ऊसदर साताऱ्यातही लागू करण्याचे दिले होते आश्वासन; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
सातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा जो निर्णय होईल, तोच निर्णय सातारा जिल्ह्यातही लागू केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आता त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केल्याचे दिसत असून, पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला फिरवली पाठ, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे सातारा युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे (सोनू) यांनी केला आहे.
बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केली होती. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा जो निर्णय होईल, तोच निर्णय सातारा जिल्ह्यातही लागू करण्याची ग्वाही दिली होती. बैठकीतील चर्चेचा आणि पालकमंत्र्यांच्या विनंतीचा आदर राखून आंदोलनाबाबत संघटनेने भूमिका घेतली होती. मात्र, आता पालकमंत्र्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी संघटनांमध्ये संभ्रम आणि ऊस उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.
बैठकीत दिलेली आश्वासने केवळ आंदोलन थांबवण्यासाठीच होती का? कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा निर्णय साताऱ्यातही लागू करण्याचे आश्वासन दिले असताना आता भूमिका का बदलली जात आहे? सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी कोणाची? असे सवाल प्रकाश साबळे यांनी उपस्थित केले आहेत.
यंदा सातारा जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळणे ही त्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यात जो ऊसदर निश्चित होईल, तोच सातारा जिल्ह्यातही लागू करण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठकीत दिलेली आश्वासने पाळलीच पाहिजेत. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळेपर्यंत ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर ठेवणार असल्याचा इशाराही प्रकाश साबळे यांनी दिला आहे.
— प्रकाश साबळे (सोनू)
युवक जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, सातारा