पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवाळी गोड!

सातारा तालुका पोलिसांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; १५ ते २० दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Live Maharashtra 24
पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवाळी गोड!

सातारा तालुका पोलिसांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; १५ ते २० दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप

सातारा : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव जपणाऱ्या सातारा तालुका पोलिसांनी दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला. दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात सणाचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करून पोलिसांनी आपुलकीचा संदेश दिला.

शिवतेज हॉल येथे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, कार्यक्षेत्र महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात सुमारे १५ ते २० दिव्यांग बंधू-भगिनींना मिठाई व भेटवस्तू देण्यात आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीमुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम यांनी केले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी दिव्यांग बांधवांना वेळोवेळी सहकार्य करीत असून, त्यांच्या अडचणींच्या वेळी मदतीचा हात देत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांच्या या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संस्थेच्या वतीने प्रशांत बगले यांनी आभार मानले. सातारा तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून संस्थेला आणि दिव्यांग बांधवांना सातत्याने सहकार्य मिळत असल्याचे सांगून त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, यासाठी सर्वांनी सामाजिक संवेदनशीलता जपत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, हवालदार धनंजय कुंभार, मनोज गायकवाड, महेंद्र नारनवर, संतोष शेलार, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव आदी उपस्थित होते.

कर्तव्य बजावताना माणुसकीचे नाते जपणाऱ्या सातारा तालुका पोलिसांच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांची दिवाळी अधिक आनंददायी झाली. समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा प्रयत्न उपस्थितांसाठीही समाधान देणारा ठरला. पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


जाहिरात / Advertisement
Sp construction
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार