सातारा जिल्ह्यासाठी सकाळी १० ते ११ वेळ; नागरिकांना मते मांडण्याची संधी
पुणे, दि. २८ :
समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते, सूचना आणि हरकती जाणून घेण्यासाठी पुणे विभागात रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात ही सुनावणी होणार असून, संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांतही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या जनसुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यासाठी सकाळी १० ते ११, सांगली जिल्ह्यासाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०, सोलापूर जिल्ह्यासाठी दुपारी १ ते २, कोल्हापूर जिल्ह्यासाठी दुपारी ३ ते ४ आणि पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
समितीचे सदस्य पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुणे येथे उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना समितीसमोर प्रत्यक्ष आपले म्हणणे मांडता येणार आहे. तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे.
जनसुनावणीसाठी इच्छुक नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सुनावणीत हितसंबंधित गट, विविध संस्था आणि नागरिकांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
ज्या नागरिकांना प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होता येणार नाही, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टलवर ३७ मुद्द्यांबाबत आपली मते ऑनलाइन नोंदविता येणार आहेत.