सातारा जिल्हा परिषदेत ‘हिरकणी कक्ष’ पुन्हा होणार कार्यान्वित!

महिला कर्मचारी, अभ्यागत महिला आणि त्यांच्या बालकांसाठी स्वतंत्र सुविधायुक्त कक्ष; महिला व बालकल्याण समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णयसातारा : सातारा जिल्हा परि...

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
सातारा जिल्हा परिषदेत ‘हिरकणी कक्ष’ पुन्हा होणार कार्यान्वित!

महिला कर्मचारी, अभ्यागत महिला आणि त्यांच्या बालकांसाठी स्वतंत्र सुविधायुक्त कक्ष; महिला व बालकल्याण समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी तसेच विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या महिला अभ्यागत आणि त्यांच्या लहान बालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंद अवस्थेत असलेला ‘हिरकणी कक्ष’ पुन्हा कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या २७ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेत समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी हिरकणी कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी सभापती ऋतुजाताई शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने समितीच्या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महिला कर्मचारी, महिला अभ्यागत आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान बालकांच्या सोयीसाठी हा कक्ष पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कक्षामध्ये लहान बालकांसाठी खेळणी आणि आवश्यक सुविधा एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कक्षाचे कामकाज प्रभावीपणे चालावे आणि महिलांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी सातारा शहरालगतच्या बंद पडलेल्या अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवा हिरकणी कक्षासाठी उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर तसेच शासनाकडे मागणी करून पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती सभापती ऋतुजाताई शिंदे यांनी दिली.

हिरकणी कक्ष पुन्हा सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणाऱ्या माता व महिलांना आपल्या लहान बालकांसह काही वेळ सुरक्षितपणे थांबण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच स्तनदा माता आणि महिला कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजादरम्यान आवश्यक सोयी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच माता आणि बालकांच्या गरजांचा विचार करणारा हा उपक्रम ठरणार आहे.

महिला कर्मचाऱ्यांनी सातत्याने केलेल्या मागणी व पाठपुराव्याला या निर्णयामुळे प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयाचे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागरान, महिला जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

सभापती ऋतुजाताई शिंदे म्हणाल्या, “महिला ही केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर समाजाच्या विकासाचीही महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या माता-भगिनींना आपल्या लहान बालकांसह गैरसोयीचा सामना करावा लागू नये, तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा मिळाव्यात, हा हिरकणी कक्ष पुनरुज्जीवित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन हा कक्ष केवळ नावापुरता न राहता प्रत्यक्ष उपयोगी आणि सुविधायुक्त व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न राहील. महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेता आला, याचे समाधान आहे. महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि सोयीस्कर कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती यापुढेही कटिबद्ध राहील.”

— ऋतुजाताई शिंदे
सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद, सातारा


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार