सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा दिमाखदार पदवीदान सोहळा
सातारा : प्रतिनिधी
ज्ञान, जिद्द, मेहनत आणि सेवाभावाच्या जोरावर सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या १०१ विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. २०२० ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून बी.एच.एम.एस. पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून रुग्णसेवेच्या नव्या पर्वात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. महाविद्यालयाच्या ४९ व्या बॅचने पदवी प्राप्त करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे अकॅडमिक कौन्सिल इन्चार्ज डॉ. सुनील बन्ने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी निशांत गवळी, संचालक डॉ. रवी भोसले, प्राचार्य डॉ. मनीष इनामदार, सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुशर्रफ सय्यद, सावकार फार्मसी कॉलेजचे प्राचार्य वसंत लोखंडे तसेच सावकार इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शरद मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदवी मिळविणे हा केवळ शैक्षणिक प्रवासाचा शेवट नसून समाजाच्या आरोग्यसेवेत योगदान देण्याची नवी सुरुवात आहे. रुग्णसेवेचा वसा जपत ज्ञान, कौशल्य आणि संवेदनशीलतेच्या बळावर समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
१०१ नवोदित डॉक्टरांच्या यशामुळे सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक गौरवास्पद अध्याय जोडला गेला.