तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका! अदानी कंपनीला काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

वन्यजीव मंडळाच्या पूर्वपरवानगीचा मुद्दा ऐरणीवर; तीन दिवसांत खुलासा सादर करण्याची नोटीस, साताऱ्यात चर्चेला उधाण

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका! अदानी कंपनीला काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

वन्यजीव मंडळाच्या पूर्वपरवानगीचा मुद्दा ऐरणीवर; तीन दिवसांत खुलासा सादर करण्याची नोटीस, साताऱ्यात चर्चेला उधाण

सातारा | प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या १,५०० मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला वनविभागाने मोठा दणका दिला आहे. वन्यजीव मंडळाची (NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत वनविभागाने काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कंपनीला तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

वनविभागाच्या १३ नोव्हेंबर रोजीच्या नोटिशीनुसार, संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, प्रकल्पाचे नकाशे आणि वृक्षतोडीबाबतच्या मंजुरीची कागदपत्रे सादर करण्यास कंपनीला सांगण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी पाटण तालुक्यातील निवडे, तोंडोशी, काळंबे आणि जाळू या गावांमधील १५०.७४ हेक्टर बिगर वनजमिनीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने १६ नोव्हेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकल्पाचा कोणताही भाग अधिसूचित संरक्षित क्षेत्रात येत नसून वनजमीनही समाविष्ट नसल्याचा कंपनीचा दावा आहे. यासाठी २३ जानेवारी २०२४ रोजी बिगर वनजमीन प्रमाणपत्र, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यावरणीय मंजुरी आणि ७ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. वन्यजीव मंडळाकडील प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे वनविभागाची कारवाई आणि कंपनीची भूमिका यामुळे तारळी प्रकल्पाबाबत नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आवश्यक परवानग्यांचा मुद्दा स्पष्ट होईपर्यंत प्रकल्पाचे काम थांबवण्याच्या आदेशामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रकल्प रद्द झालेला नसून, सध्या वनविभागाने काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील चौकशी आणि परवानग्यांबाबतच्या स्पष्टीकरणानंतरच या प्रकल्पाचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार