एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे!

शासकीय निर्णय प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप आणि पारदर्शकता अनिवार्य – प्रधान सचिव ब्रिजेश सिंहमुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करताना मानवी क्षमतांना ...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे!

शासकीय निर्णय प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप आणि पारदर्शकता अनिवार्य – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई : 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करताना मानवी क्षमतांना पर्याय निर्माण करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत एआयचा वापर सहाय्यक म्हणून व्हावा; मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मानवी हस्तक्षेप आणि पडताळणी अनिवार्य असावी. एआयचा वापर सार्वजनिक हित, जबाबदारी, पारदर्शकता आणि सुशासनाच्या तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’चे सीईओ प्रवीण परदेशी, सर्विस नाऊच्या वरिष्ठ संचालक गरिमा बब्बर, ओपन टेक्स्टचे देश संचालक मनीष बलूजा, डेलॉइट इंडियाचे पार्टनर जय गुहा, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय कामकाजात एआयच्या वापराचे महत्त्व स्पष्ट करताना ब्रिजेश सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘महा एआय’ या स्थानिक पातळीवर होस्ट केलेल्या सर्वम मॉडेलचा अनुभव सांगितला. शासन निर्णय, प्रशासकीय तरतुदी, पूर्वीचे संदर्भ, खर्चाच्या मर्यादा आणि विविध भाषांमधील जनसंपर्काचे स्वरूप यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे या प्रणालीच्या मदतीने उपयुक्त मसुदे तयार करणे शक्य झाले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ वाचून कामकाज अधिक गतिमान होऊ शकते. मात्र, अंतिम मसुद्याची पडताळणी आणि मान्यता अधिकाऱ्यांनीच देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या डिजिटायझेशनपासून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी आधार, यूपीआय आणि डिजीयात्रा यांसारख्या सुविधांची उदाहरणे दिली. भारताने उभारलेली डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था जागतिक स्तरावर आदर्श ठरली असून, त्याच्या आधारावर एआय सक्षम सेवा आणि व्यवहार प्रणाली विकसित करण्याची मोठी संधी देशासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

एआयमुळे रोजगाराच्या संधी कमी होण्याच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मानवी श्रम आणि कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. एआयने माणसाची जागा घेण्याऐवजी त्याच्या कामाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता वाढविण्यास मदत केली पाहिजे. चालकविरहित वाहने आणि ‘डार्क फॅक्टरी’सारख्या संकल्पना स्वीकारताना देशाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एआयच्या वापरातील संभाव्य धोके स्पष्ट करताना त्यांनी ऑस्ट्रेलियातील ‘रोबोडेब्ट’ प्रकरणाचा दाखला दिला. कल्याणकारी योजनांमधील लाभार्थ्यांची स्वयंचलित पडताळणी करताना प्रणालीतील त्रुटींमुळे चुकीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. अखेर ही प्रक्रिया बंद करावी लागली. त्यामुळे महत्त्वाचे शासकीय निर्णय पूर्णपणे एआयवर सोपविणे धोकादायक ठरू शकते. एआयने दिलेल्या निष्कर्षांची मानवी स्तरावर पडताळणी करूनच निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘महा क्राइम ओएस’ या प्रायोगिक उपक्रमाची माहिती देताना त्यांनी गुन्हेगारीच्या घटनांमधील विशिष्ट पद्धती आणि प्रवृत्तींचे विश्लेषण एआयच्या माध्यमातून करता येऊ शकते, असे सांगितले. वाहनचोरी, घरफोडी आणि पाकीटमारी यांसारख्या गुन्ह्यांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून तपास प्रक्रियेला मदत मिळू शकते. मात्र, माहितीची सत्यता तपासून पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी मानवी अधिकाऱ्यांचीच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय यंत्रणांमध्ये एआयचा वापर करताना तंत्रज्ञानाची निवड, स्वदेशी अथवा परदेशी प्रणालींचा वापर, स्वतःची प्रणाली विकसित करणे, संगणकीय क्षमता आणि उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन या बाबींचा जोखमीच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

एआयचा वापर जबाबदारीने, संभाव्य जोखमींचे मूल्यमापन करून आणि सार्वजनिक हिताला केंद्रस्थानी ठेवून करणे, हाच एआय सुशासनाचा मूलमंत्र आहे, असा संदेश देत ब्रिजेश सिंह यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या