३ लाख २ हजार ७७७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती
सातारा, दि. १२ : सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून दिवाळी अग्रीम म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत, अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
ई-पंचनामा पोर्टलवरील आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण ४ लाख ४०५ शेतकरी पीक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३ लाख २ हजार ७७७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे दिवाळी अग्रीम जमा झाले आहे.
दरम्यान, अद्याप दिवाळी अग्रीमची रक्कम न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये. अशा शेतकऱ्यांना ई-पंचनामा प्रक्रियेद्वारे शासन निर्णयातील विहित निकष व दरानुसार सानुग्रह अनुदान आणि पीक नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही शासन स्तरावरून वेगाने सुरू आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.