सातारा : महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आक्रमक झाली आहे. राज्यातील विविध भागांत घडलेल्या चार गंभीर प्रकरणांतील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
राकेश जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी सांगळे हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच क्षेत्र माहुली येथील मागासवर्गीय समाजाच्या जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून जमीन मूळ मालकांना परत मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय वैजापूर येथील रोहित पठारे यांच्या हत्येप्रकरणी तसेच खटाव तालुक्यातील नेर येथील राजेंद्र वायदंडे यांच्या हत्येप्रकरणी संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या चारही प्रकरणांतील पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सातारा जिल्हाध्यक्ष मदन (बापू) भगवान खंकाळ यांनी दिला.
यावेळी दादासाहेब ओव्हाळ, विजय ओव्हाळ, पवन धायगुडे, किरण ओव्हाळ, स्वराज जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.