LIVE महाराष्ट्र 24
निष्पक्ष, थेट आणि वेगवान न्यूज
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच सैनिक व माजी सैनिकांसाठी विशेष दिवाळी फराळ सोहळ्याचे आयोजन
सातारा : देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथमच सैनिक व माजी सैनिकांसाठी विशेष दिवाळी फराळ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमेळाव्याला सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून या विशेष स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देशसेवेसाठी आयुष्याची अनमोल वर्षे समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करणे, त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही भावना पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा सण आहे. मात्र, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना अनेकदा सण-उत्सव कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागतात. अशा सैनिकांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
महासैनिक हॉल अँड लॉन्स, टीसीपीसी, करंजे नाका, सातारा येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. सैनिक कल्याण विभाग आणि मराठी महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी फराळाचा आस्वाद घेत स्नेहसंवाद साधला. उपस्थित मान्यवरांनी सैनिकांच्या देशसेवेचा गौरव करून त्यांच्या त्याग व समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
हा उपक्रम केवळ दिवाळी फराळापुरता मर्यादित न राहता समाज आणि सैनिक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा ठरला. देशाच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या वीर जवानांच्या आनंदात सहभागी होत साताऱ्यातून कृतज्ञतेचा आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला.
LIVE महाराष्ट्र 24 | सातारा