गणेश मंडळांच्या कार्याचा होणार गौरव; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पुरस्कार वितरण
सातारा | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गणराया अवॉर्ड स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस मल्टिपर्पज हॉल, राधिका रोड, सातारा येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गणराया अवॉर्ड स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकतेचे, संस्कृतीचे आणि सेवाभावाचे व्यासपीठ बनावे, या उद्देशाने गणराया अवॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून गणेश मंडळांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला जाणार आहे.
विशेष म्हणजे पुरस्कार वितरण सोहळ्यासोबत रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेश मंडळांच्या कार्याचा सन्मान आणि रक्तदानातून माणुसकीचा जागर, असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.