माण-खटावचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे!

रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना निधी देणार; पशुधनाच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मंत्री जयकुमार गोरेसातारा,...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
माण-खटावचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे!


रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना निधी देणार; पशुधनाच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मंत्री जयकुमार गोरे

सातारा, दि. २३ : माण आणि खटाव तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ट्रान्सफॉर्मरअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महावितरणने नवीन व दर्जेदार ट्रान्सफॉर्मर बसवून पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पशुधन ही आपली ताकद असून त्याच्या संरक्षणासाठी शासन सर्वतोपरी काळजी घेईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

माण तालुक्यातील गोंदवले येथील शेतकरी भवन येथे माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती आणि करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

बैठकीस आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य सोनिया गोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत मंत्री गोरे म्हणाले, राज्य शासनाने संवेदनशीलतेने दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले असून दुष्काळी उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीही स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीपोटी आपली जनावरे कमी किमतीत विकू नयेत. प्रशासनाने पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. पाणी व चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यापेक्षा महत्त्वाचे दुसरे कोणतेही काम नाही. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून जबाबदारी पार पाडावी.

औंध पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन २० डिसेंबर रोजी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, तसेच मार्डी योजनेतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. ट्रान्सफॉर्मरअभावी पाणीपुरवठा योजना बंद राहणार नाहीत, यासाठी महावितरणने योग्य नियोजन करावे. डीपी चोरीच्या घटना घडणाऱ्या भागांत ग्रामस्थांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळी उपाययोजनांचे नियोजन केवळ तालुका किंवा जिल्हा स्तरावर न करता ग्रामपातळीवर करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावातील चारा व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करावे. गावपातळीवर चारा उपलब्धता वाढविण्यावर भर द्यावा. आवश्यक ठिकाणी बंधारे व अन्य जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी. रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे सुरू करावीत. तलावांमधील गाळ काढणे, गळती रोखणे आणि जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देशही मंत्री गोरे यांनी दिले.

या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, महावितरण, पशुसंवर्धन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण, मृद व जलसंधारण, सिंचन, लघुपाटबंधारे, रोजगार हमी योजना तसेच जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याशिवाय माण व खटाव तालुक्यांतील चारा आणि पाणी उपलब्धतेबाबतही चर्चा करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या