आकर्षक क्रमांकांसाठी वाहनधारकांना संधी; एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास सर्वाधिक बोली लावणाऱ्यास मिळणार पसंतीचा क्रमांक
सातारा, दि. २८ :
सातारा जिल्ह्यातील दुचाकी वाहनांसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘एमएच ११ ईडी ०००१ ते ९९९९’ ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका सोमवार, दि. ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित शुल्क भरून संबंधित कार्यालयात क्रमांक आरक्षित करावेत, असे आवाहन सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दुचाकी वाहनांच्या या मालिकेतील आकर्षक क्रमांक अन्य वाहनांसाठीही घेता येणार असून, त्यासाठी नियमानुसार तिप्पट शुल्क भरावे लागणार आहे. पसंतीचे क्रमांक देताना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाचा अवलंब करण्यात येणार आहे. अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत तसेच आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड यापैकी एका ओळखपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय वैध ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पिनकोड देणे बंधनकारक आहे.
३० नोव्हेंबर रोजी दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तिप्पट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी घेऊ इच्छिणाऱ्यांचे एलएमव्ही अर्ज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत धनाकर्षासह स्वीकारले जातील. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्यास त्याच दिवशी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल. सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदाराला संबंधित क्रमांक देण्यात येईल.
तसेच २ डिसेंबर रोजी आकर्षक क्रमांकांसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत धनाकर्षासह अर्ज स्वीकारले जातील. एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल. सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदाराला पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांचे धनाकर्ष परत करण्यात येतील.
आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर १८० दिवसांच्या आत संबंधित वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी केले आहे.