यूथ पार्लियामेंट आणि यंग लीडर्स डायलॉग स्पर्धेतून विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड
सातारा : प्रतिनिधी
नशेच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढून विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवा शक्तीला योग्य दिशा देण्याचा संदेश साताऱ्यातील ‘विकसित भारत यूथ पार्लियामेंट २०२७’ आणि ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ या स्पर्धांच्या माध्यमातून देण्यात आला. छत्रपती शिवाजी कॉलेज येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत युवकांनी विचारांची ताकद, वक्तृत्वकला आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले.
मेरा युवा भारत (माय भारत), सातारा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठांतर्गत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर यूथ पार्लियामेंट स्पर्धेत युवकांनी आपली मते ठामपणे मांडत व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश दिला. तर यंग लीडर्स डायलॉगच्या पीपीटी फेरीत इनोव्हेशन इकॉनॉमी, पर्यटन आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्री या विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पक सादरीकरणे केली.
यूथ पार्लियामेंट स्पर्धेत विठ्ठल दत्तात्रय जगताप यांनी प्रथम, नेहा निलेश माने यांनी द्वितीय, तर तेजोमयी नरेंद्र पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
यंग लीडर्स डायलॉगच्या पीपीटी फेरीत पंकज गांधी यांनी प्रथम, दिव्या सदावरते यांनी द्वितीय, मुद्रा विजय जाधव यांनी तृतीय, चैतन्य यादव यांनी चतुर्थ, वैष्णवी रोकडे यांनी पाचवा, तर अबुजार नदाफ यांनी सहावा क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले स्पर्धक राज्यस्तरीय फेरीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे १२ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या युवा महोत्सवात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी निवड झालेल्या स्पर्धकांना मिळणार आहे.
कार्यक्रमास डॉ. अनिल कुमार वावरे, क्रीडा अधिकारी संस्कृती मोरे, प्रा. डॉ. साळुंखे, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, स्वप्निल जाधव, डॉ. राजेंद्र तांबिले, डॉ. सुभाष कारंडे, प्रा. नवनाथ इप्पर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण पत्रकार विजय मांडके, प्राचार्य विजय जाधव, ॲड. शेरखंड डांगे, भानुदास यादव, डॉ. संजय सरगडे, प्राचार्य शाली जोसेफ आणि प्रा. महादेव चिंदे यांनी केले.
प्रास्ताविक माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन सायली पडवळ यांनी केले. आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माय भारत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अक्षय माने, गणेश पवार, प्रीती जाधव आणि स्नेहल शेळके यांनी परिश्रम घेतले.