सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी – मंत्री जयकुमार गोरे
सातारा, दि. २३ : श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरी सज्ज झाली असून, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून यात्रा आदर्श पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड येथील जोगेश्वरी हॉलमध्ये यात्रेच्या नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडे, तहसीलदार मीना बाबर, मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्षा पूजा वीरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यात्रास्थळी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधांचे योग्य नियोजन करावे. महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा. येणारा एकही भाविक आवश्यक सुविधांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व भाविकांना सन्मानाची वागणूक द्यावी.
अन्न व औषध प्रशासनाने पिण्याचे पाणी व खाद्यपदार्थांची तपासणी करावी. एसटी महामंडळाने यात्रा काळात पुरेशा बसेस उपलब्ध करून सर्व गाड्या सुस्थितीत ठेवाव्यात. वीजपुरवठा अखंडित राहील, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यात्रा कालावधीत रथोत्सवाच्या मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत व खड्डेमुक्त ठेवावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मंदिर परिसरात तेल व पाणी सांडणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.
यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना व सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.