कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून, प्रतिटन ४ हजार २०० रुपये देण्याचा प्रस्ताव साखर कारखानदारांनी मान्य केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाला अखेर यश आले आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊसदरावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ३ हजार ९०० रुपये मिळणार आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम संपताना प्रतिटन १०० रुपये, तर पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी २०० रुपये देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण प्रतिटन ४ हजार २०० रुपये मिळणार आहेत.
ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे आंदोलन तीव्र केले होते. सलग अनेक तास महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
अखेर चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर राजू शेट्टी यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मागणीला मिळालेला हा महत्त्वपूर्ण प्रतिसाद मानला जात आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी सुरू असलेल्या संघर्षातून हा निर्णय झाला असून, आता जाहीर झालेल्या दराची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE महाराष्ट्र 24
सत्यमेव जयते…!