विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीची ठोस पावले; प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता मंजूर करण्याची मागणी
सातारा : वडूथ (ता. जि. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी वडूथ ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, सातारा यांना निवेदन देण्यात आले.
लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी मदन साबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन सादर करण्यात आले. शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळेसाठी स्वतंत्र व अधिकृत रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वडूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेकडे जाण्यासाठी सध्या केवळ तीन फूट रुंदीचा खासगी मार्ग उपलब्ध आहे. या अरुंद मार्गावरून दुचाकी वाहन जाणेही शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी जागेतून असलेला हा मार्ग भविष्यात बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, गाव नकाशा व महसुली अभिलेख तपासावेत आणि शाळेसाठी आवश्यक रुंदीचा कायमस्वरूपी, सुरक्षित व अधिकृत रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती, सातारा येथील गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर : अभिजीत साबळे (उपसरपंच), मदन साबळे (सामाजिक कार्यकर्ते, भाजपा युवा मोर्चा), वर्षा साबळे (जिल्हा परिषद शाळा सदस्य), विजय साबळे (माजी सरपंच), विक्रांत साबळे (सदस्य, शिक्षण समिती, वडूथ इंग्लिश स्कूल), आकाश साबळे, अमित साबळे आणि महेश साबळे उपस्थित होते.
LIVE महाराष्ट्र 24
निष्पक्ष, थेट आणि वेगवान न्यूज