LIVE महाराष्ट्र२४
महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र
ऐतिहासिक पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतूक निर्बंधांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह!
वाढे फाट्यावरील वाहतूक कोंडी, जड वाहनांची नियमबाह्य ये-जा, हाइट बॅरिअर आणि वॉर्डनच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; पोलीस प्रशासन व NHAI कडून ठोस कार्यवाहीची मागणी
ऐतिहासिक पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतूक निर्बंधांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह!
वाढे फाट्यावरील वाहतूक कोंडी, जड वाहनांची नियमबाह्य ये-जा, हाइट बॅरिअर आणि वॉर्डनच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; पोलीस प्रशासन व NHAI कडून ठोस कार्यवाहीची मागणीसातारा : सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीवरील वाढे आणि वडूथ येथील ऐतिहासिक पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुलांच्या संरक्षणासाठी अवजड वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष रस्त्यावर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढे फाटा परिसरातील वाहतूक कोंडी, नियमबाह्य जड वाहनांची ये-जा, हाइट बॅरिअरचे नुकसान आणि अतिक्रमणांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी केली आहे.सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीवरील वाढे आणि वडूथ येथील वेण्णा व कृष्णा नदीवरील ऐतिहासिक दगडी कमानींचे पूल अवजड वाहतुकीसाठी २८ सप्टेंबर २०२६ पासून २० जून २०२७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NHAI च्या पाहणीत पुलांमध्ये पाणी पाझरणे, संरचनात्मक तडे आणि कमानींच्या भागात झीज झाल्याचे निदर्शनास आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र, निर्बंधांची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी न होता प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थेत त्याचे प्रतिबिंब दिसणे आवश्यक आहे.वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेची सक्रिय भूमिका आवश्यकजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त पोलीस वॉर्डन यांच्यासह स्थानिक पोलीस प्रशासनानेही नियमित पाहणी करणे गरजेचे आहे. नियमबाह्य जड वाहने सोडली जात असल्याच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज, वाहतूक नोंदी आणि प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करावी. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.वाहतूक वॉर्डनना धमक्या; पोलिसांनी संरक्षण देण्याची गरजऐतिहासिक पुलांवरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक वॉर्डनना काही वाहनचालकांकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. नियमांची अंमलबजावणी करताना वॉर्डनवर दबाव आणला जात असेल, तर ही बाब गंभीर आहे. अशा परिस्थितीत वॉर्डनना एकटे सोडून चालणार नाही. त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर आणि धमक्या देणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त व संरक्षण उपलब्ध करून द्यावे. वॉर्डनना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येईल, अशी व्यवस्था करावी. नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पोलीस प्रशासन ठामपणे उभे राहिले पाहिजे.आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारींची वरिष्ठ स्तरावर चौकशी करा!अवजड वाहतुकीवरील निर्बंध असतानाही काही जड वाहने नियमबाह्य पद्धतीने सोडली जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही वाहनचालकांकडून आर्थिक देवाणघेवाण करून वाहने पुढे जाऊ दिली जात असल्याचीही चर्चा होत आहे. या तक्रारींची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी. संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, वाहतूक नोंदी आणि प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे वस्तुस्थिती समोर आणावी. कोणताही पोलीस कर्मचारी किंवा संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि नियमभंग करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अभय मिळू नये, ही अपेक्षा आहे.वाढे फाट्यापूर्वीच जड वाहने
पर्यायी मार्गावर वळवा!वाढे फाटा परिसरात अतिक्रमणे, दुकानांसमोरील बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. जड वाहने पुलाजवळ आल्यानंतर त्यांना थांबविण्याऐवजी महामार्गावर योग्य ठिकाणीच पर्यायी मार्गाकडे वळविण्याची व्यवस्था करावी.वाहतूक अधिसूचनेनुसार लोणंदकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने खंडाळा किंवा शिरवळमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावरून साताऱ्याकडे येतील. साताऱ्याकडून लोणंदकडे जाणारी अवजड वाहने वाढे फाट्यावर न वळता पुणे-बंगळूर महामार्गाने खंडाळा-शिरवळमार्गे पुढे जातील.साताऱ्याकडून फलटणकडे जाणारी अवजड वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव, पुसेगाव आणि ताथवडे घाटमार्गे वळविण्यात आली आहेत. फलटणकडून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठीही संबंधित पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. आदर्की फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी पिंपोडे बुद्रुक, सर्कलवाडी, शिरगाव घाट आणि जोशीविहीरमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावर जाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.या पर्यायी मार्गांची माहिती वाहनचालकांना आधीच मिळावी, यासाठी पुरेसे दिशादर्शक फलक, ब्लिंकर आणि रिफ्लेक्टर बसविणे आवश्यक आहे.हलकी वाहने, एसटी बस आणि शालेय बस यांच्या वाहतुकीसाठी अधिसूचनेतील परवानगी कायम राहील, याची दक्षता घ्यावी.हाइट बॅरिअरचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घ्या!जड वाहनांना रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या हाइट बॅरिअरचे नुकसान झाल्याचा प्रकार गंभीर आहे. यामुळे निर्बंधित मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण होते. या प्रकाराची चौकशी करून बॅरिअरचे नुकसान कोणी केले, याचा शोध घ्यावा. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून बॅरिअर तातडीने पूर्ववत करावेत. तसेच NHAI ने सूचना फलक, रात्री स्पष्ट दिसणारे ब्लिंकर आणि रिफ्लेक्टर बसवून नियमित देखभाल करावी.अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगवर संयुक्त कारवाईची गरजवाढे फाटा परिसरातील अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्याची वाहतूक क्षमता कमी होत आहे. पोलीस प्रशासन, NHAI आणि संबंधित स्थानिक विभागांनी संयुक्त पाहणी करून अतिक्रमणे हटवावीत. बेकायदा पार्किंगवर कारवाई करून वाहतुकीसाठी आवश्यक जागा मोकळी करावी.दुर्घटनेनंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा आधीच कार्यवाही करा!वाढे आणि वडूथ येथील ऐतिहासिक पुलांची सुरक्षितता हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषय आहे. पुलांच्या संरक्षणासाठी NHAI ने तांत्रिक उपाययोजना करणे, पोलीस प्रशासनाने निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि संबंधित विभागांनी अतिक्रमण व पार्किंगचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.उद्या पुलाला काही नुकसान झाले किंवा एखादी गंभीर दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? पोलीस प्रशासन, NHAI की संबंधित विभाग? दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा आजच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे.या प्रश्नावर २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत मदन साबळे यांनी पुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याची मागणी केली आहे. पर्यायी मार्गांचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, वाहतूक वॉर्डनची सुरक्षा, आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारींची चौकशी, हाइट बॅरिअरची सुरक्षितता आणि नियमभंग करणाऱ्यांवरील कारवाई या सर्व बाबी मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्याऐवजी जबाबदारी स्वीकारावी. दुर्घटना घडण्याची वाट पाहू नका; आजच ठोस कार्यवाही करा!— मदन साबळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव, सातारा
जलद वार्ता
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१
महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT