Breaking News
मुंबई : मुंबईची शान असलेली डबलडेकर बस प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सामील झाली आहे. आरटीओचा क्लीअरन्स मिळाल्यानंतर डबलडेकर बस प्रवासी सेवेत असेल अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. त्यामुळे वातानुकूलित डबलडेकर बसने गारेगार प्रवासाची प्रतीक्षा संपली आहे.
दरम्यान एकूण ५४ आसन क्षमता असलेल्या ९०० डबल डेकर बसेस टप्प्याटप्याने दाखल होतील. डबलडेकर बसेस मुंबईची शान असून १५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४५ डबलडेकर बसेस आहेत. मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन ९०० वातानुकूलित डबलडेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. अशोक लेलँड कंपनीच्या या बसेस आहेत. लंडनमधील डबलडेकर बसच्या धर्तीवर या बसेस आहेत. इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जातो. त्या धाटणीत तयार केलेली पहिली वहिली इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बस बेस्टच्या ताफ्यात सामील झाली आहे. डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच ही बस मुंबईकरांसाठी नंदनवन ठरणार आहे.
बसचा मार्ग
रविवारी वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून. सोमवारी सकाळी कुलाबा बेस्ट भवन येथे चावी देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी-कुर्ला पश्चिम दरम्यान ही पहिली डबलडेकर बस धावणार आहे. तर टप्प्याटप्प्याने येणाऱ्या डबलडेकर बस शहरात चालवण्यात येणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra