महिला होणार व्यावसायिक! घरघंटी शिलाईयंत्रांचे लवकरच वाटप महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचा पुढाकार


मुंबई : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिलाईयंत्रे घरघंटी मसाला दळायचे यंत्र आदी वस्तूंचे वाटप करण्यात येते. महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी ६३५६ शिवणयंत्र आणि ६३५६ घरघंटी तसेच २३६२ मसाला कांडप यंत्राचे वाटप केले जाणार आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना यंत्राच्या एकूण रकमेच्या केवळ ५ टक्के रक्कम भरावी लागणार असून उर्वरीत ९५ टक्के रकमेचे अनुदान महापालिकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.


महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून जेंडर बजेट अंतर्गत सन २०१८-१९च्या आर्थिक वर्षांपासून पात्र महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून महिला बचत गट तथा महिलांना सॅनिटरी पॅड, शिवणकाम घरघंटी व खाद्यपदार्थ आदी प्रकारची यंत्रसामुग्री खरेदी करण्याकरता राज्य शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण धोरणान्वये अनुदान देण्यात येते. त्यामुळे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात पात्र महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावामुळे महिलांची परिस्थिती खालावलेली असल्यामुळे संपूर्ण मुंबईमधून १० ते १५ हजार गरीब व गरजू विधवा महिलांना लघु व्यावसायासाठी शिलाईयंत्रे घरघंटी इत्यादी प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून होत आहे जेणेकरून गरीब व गरजू महिला स्वयंरोजगार करून आपली उपजिवीका पूर्ण करू शकतील. लाभार्थी महिलांनी मुंबईत १५ वर्षे वास्तव्याचा दाखला सादर करणे गरजेचे असून त्यांचे वय १८ ते ६० यादरम्यान असावे.


लाभार्थीने भरावयाची ५% रक्कम


घरघंटी एकूण किंमत २००६१ (लाभार्थीने भरावयाची रक्कम १००२ रुपये) 

शिवणयंत्र एकूण किंमत १२२२१ (लाभार्थीने भरावयाची रक्कम ६११ रुपये) 

मसाला कांडप एकूण किमत - ३५५१८ (लाभार्थीने भरावयाची रक्कम १७७६ रुपये)


अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे


> पिवळ्या तथा केशरी रंगाची शिधापत्रिका.

> आधार कार्ड  मतदान कार्ड  पॅन कार्ड  प्रतिज्ञापत्र.

> विधवा लाभार्थ्यांच्या बाबतीत पतीचा मृत्यूचा दाखला.

> घटस्फोटाच्या बाबतीतील दाव्याचे कागदपत्र.

> लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास तसे प्रमाणपत्र.

> गिरणी कामगार असल्यास शिधापत्रिकेवरील शिक्का

>  कोविड मृत्यूचा दाखला.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट