“ठाण्यातील सभा म्हणजे माझ्या विरोधातील…” मनोज जरांगेंच्या ठाणे दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया


मनोज जरांगे सध्या ठाणे दौऱ्यावर आहेत यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध भागांत जाऊन ते सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील ठाणे-पालघर दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे सभा घेत असल्याने याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. यावर आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


मनोज जरांगे यांच्या ठाण्यातील सभेबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “मनोज जरांगे सध्या सगळीकडे सभा घेत आहेत. त्यामध्ये कसलीही अडचण नाही. ते सगळ्या मराठा बांधवांना भेटतायत. ठाण्यामधील सभा म्हणजे माझ्या विरोधातील सभा नाही. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटतायत. सर्वांशी संवाद साधतायत.”


“मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. यासाठी सरकार कटिबद्ध आहे. इतर कुठल्याही समाजाचं किंवा ओबीसीचं आरक्षण कमी न करता, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मराठवाड्यात जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांची समिती यावर काम करत आहे. कायमस्वरुपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकार देणार आहे. त्यावर आमचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे” असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट